मंदिराचा दरवाजा उघडणारा पुजारी आणि भक्त पोलिसांच्या ताब्यात

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणायचा असेल तर घराबाहेर पडू नका, सुरक्षित अंतर पाळा असे वारंवार आवाहन केले जात असतानाही त्याकडे सपशेल कानाडोळा करून मंदिराचे दरवाजे उघडण्याचा प्रकार पुजाऱ्याच्या व भक्तांच्या अंगलट आला आहे. या सर्वांना विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन आणि नोटीसीच्या रुपात समज देऊन सोडन दिले आहे. उल्हासनगरात कम्प नंबर ४ मध्ये असणाऱ्या एका शनी मंदिरात भक्तांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता.त्यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत होती.अखेर याची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळताच त्यांनी मंदिर गाठले असता मंदिरात गर्दी झाल्याचे दिसून आले.मंदिराचे प्रवेशद्वार बंद करायला लागून या मंदिराच्या पुजाऱ्याला व भक्तांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची पोलीस गय करणार नाही. असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिला आहे.